भोपाळ ः केंद्र सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ४२ वर्षीय दीपक मडावीचा चाचणीनंतर ९ दिवसांनी भोपाळमध्ये मृत्यू झाला आहे. विषबाधेमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे, तर मृत्यूचा लसीच्या चाचणीशी काही संबंध नाही, असे भारत बायोटेकने म्हटलेलं आहे.
१२ डिसेंबरला दीपक मडावीने लसीच्या चाचणीमध्ये सहभाग घेतला होता. “मडावी याने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीतील स्वयंसेवक म्हणून सर्व निकष मान्य केले होते. लशीची मात्रा दिल्यानंतर सात दिवसांनी तपासणीत त्याची प्रकृती चांगली होती आणि त्याच्यात कुठलीही विपरीत प्रतिक्रिया दिसून आली नव्हती”, असे मत भारत बायोटेकने मांडलेले आहे.
संबंधित रुग्णाची तपासणी केली आहे. तर, त्याचा मृत्यू विषबाधेने झाला असण्याची शक्यता मध्यप्रदेशच्या मेडिको लीगल इन्स्टिट्यूटचे डाॅ. अशोक शर्मा यांनी स्पष्ट केलेले आहे. व्हिसेरा चाचणी केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण समजू शकेल, असेही त्यांनी सांगितले आहे.