मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील NCB च्या साक्षीदाराचा मृत्यु झाला आहे. प्रभाकर राघोजी साईल (37) असे त्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. चेंबूर येथे त्यानी अखेरचा श्वास घेतला. थोड्याच वेळात त्याला अंधेरी येथील त्याच्या आईच्या घरी आणण्यात येणार आहे.
कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल हा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने चेंबूरमधील माहूल गाव येथे निधन झाले आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत होता. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचे गोसावीने त्यांना सांगितले होते.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. के पी गोसावी आणि सॅम डिसुझा यांचे फोनवरील संभाषण मी ऐकले होते. २५ कोटींचा बॉम्ब टाका, १८ कोटीपर्यंत डील फायनल करुन त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, अस या दोघांमध्ये संभाषण झाल्याचे साईल याने दावा केला होता.