पिंपरी : पती-पत्नीतील न्यायप्रविष्ट वादात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले. त्यानंतर पत्नीने तिच्या नातेवाईकांसह मिळून पतीला भर रस्त्यात दमदाटी व धक्काबुक्की केली. यातच पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.13) दुपारी दिघी येथील कृष्णानगर येथे रस्त्यावर घडली आहे. यानंतर संबधीतावर कारवाई करावी, पोलिसाचे निलंबन करावे या मागणीसाठी मयतांचे नातेवाईक हे मृतदेहासह पोलीस ठाण्याबाहेर बसले. आश्वासनानंतर प्रकरण शांत झाले.
ऋषभ मुकुंद जाधव (34, रा. दिघी) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा मित्र मिलींद बाळासाहेब पाटील (35) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पत्नी, सासू व सासरे दत्तात्रय तापकीर, भाऊ वेदांत दत्तात्रय तापकीर व दोन अळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादित म्हटल्या नुसार, पत्नी व मयत यांच्यात 2019 पासून खडकी न्यायालयात खटला सुरु होता. यातील खटल्याचा काहीअंशी निकाल हा आरोपी पत्नीच्या बाजूने लागला होता. त्यानुसार दिघी पोलिसांनी फिर्यादी व मयत ऋषभ यांना पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी बोलावले व न्यायालयाने पत्नीला ऋषभच्या घरात राहण्यासाठी मान्यता द्यावी किंवा तिची इतर ठिकाणी सोय करावी असे आदेश दिल्याचे सांगितले.
त्यानंतर पत्नी एका पोलीस कर्मचाऱ्यासह ऋषभच्या घरी गेली व तिच्या नातेवाईकांनी आरडाओरड करत गोंधळ घालत ऋषभला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथून निघून गेले असता आरोपींनी ऋषभ यांना त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर घेराव घालून शिवीगाळ करत, तू पण तुझ्या वडिलांसारखाच मरशील, बघू कोणाचा धर्म जिंकतो, तुझा की माझा म्हणत धक्काबुक्की केली व खाली ढकलून दिले. यावेळी फिर्यादी धावत ऋषभ यांच्याकडे गेले असता ते बेशुद्ध पडले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींना मयताची मेडिकल हिस्ट्री माहिती असतानाही त्यांनी जाणूनबुजूण मयताचे मानसिक खच्चीकरण केले; ज्यात त्यांचा मृत्यू झाला. यावरून शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी ही दुसऱ्या धर्माचे घरात पालन करत होती; जे ऋषभ यांना मान्य नव्हते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. याच भांडणातून आरोपी पत्नीने लग्नाच्या सहा महिन्यांनतर पतीचे घर सोडून माहेरी गेली व तिने न्यायालयात पती विरोधात खटला दाखल केला. ज्याचा शेवट हा पतीच्या मृत्यूने झाला आहे.
गुन्हा दाखल होऊन 24 तास झाले, तरी अद्याप आरोपीला अटक झाली नाही, म्हणून ऋषभ यांचे मित्र व नातेवाईक हे मृतदेहासह आज (शनिवारी) सकाळपासून दिघी पोलीस ठाण्याबाहेर थांबले होते. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोहचले. राजकीय पदाधिकारी आले आणि चौकशी नंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले.