मृत्यूची नोंद मोठी तफावत गंभीर : संजोग वाघेरे

0

पिंपरी : शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. कोरोनाबाधितांचे मृत्यू वाढले आहेत. महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयांकडून कोरोना बाधितांच्या मृत्यूची माहिती वेळोवेळी दिली जात नाही. त्यामुळे अचानक शहरात मृत्यूचा आकडा वाढल्याचे समोर येत आहे. सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणात मृत्यूची नोंद झाल्याने शहरवासी हैराण झाले आहेत.

शहरात 23 एप्रिल 2021 रोजी 72 मृत्यूची, दुस-या दिवशी 21 एप्रिल रोजी 81 मृत्यूची नोंद झाली होती. प्रत्यक्षात दोन्ही दिवसात मागील 24 तासात अनुक्रमे 8 व 12 मृत्यू झालेले आहेत. परंतु रुग्णालयांनी मृत्यूची माहिती उशिराने कळविल्याने मृत्यूचे आकडे वाढल्याचे वैद्यकीय विभागाने म्हंटले आहे.

दैनंदिन वैद्यकीय विभागांकडून दिल्या जाणा-या माहितीत व प्रत्यक्ष शहरात झालेले मृत्यू यात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2021 महिन्यात मनपाने 800 हून अधिक मृत्यूची माहिती लपविल्याचे दिसते आहे. विविध माध्यमांच्या वृत्तांमधून हे प्रकार समोर आले आहेत.

शहरात कोरोना बाधितांच्या मृत्यूची माहिती लपविणे गंभीर बाब आहे. उपचार व साधनाअभावी एकीकडे शहरात मृत्यू वाढले आहेत. तर मृत्यूनंतर देखील रुग्णालये आणि वैद्यकीय यंत्रणा मृत्यू माहिती, आकडेवारी लपवून त्यांचा अवमान करत आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालये वेळेवेर मृत्यूची माहिती न देता रुग्णाच्या नातेवाईकांकडून वैद्यकीय बिले घेऊन पैसे आकारत असल्याचा संशय या प्रकारामुळे निर्माण होत आहे. या प्रकाराची महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी व योग्य चौकशी करून दोषी आढळणा-या संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वाघेरे यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.