नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग सुरु करण्यासाठीची प्रक्रिया आता आणखी सुलभ केली आहे. त्यामुळे आता व्यवसायाच्या नोंदणीसाठी केवळ पॅनकार्ड आणि आधारकार्डाची गरज आहे. नोंदणी झाल्यानंतर सरकारकडून संबंधित व्यवसायाला विविध मार्गांनी प्रोत्साहन दिले जाईल.
केंद्रीय लघू-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली. आगामी काळात बँक आणि बिगरबँकिंग संस्था लहान उद्योगांना वित्तपुरवठा करण्यासाठी सहकार्य करतील. तसेच केवळ पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या साहाय्याने व्यवसायाची नोंदणी करता येईल.
या निर्णयांमुळे लघू व मध्यम उद्योगांना चालना मिळून रोजगारांची निर्मिती होईल. भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारायची असेल तर लघूमध्यम उद्योगक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 20 लाख कोटींच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या पॅकेजची घोषणा केली होती.
कोरोना संकटाचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात या क्षेत्रासाठी कर्ज पुनर्रचनेची मर्यादा 25 कोटी रुपयांवरुन 50 कोटीपर्यंत वाढवली होती. याशिवाय, जागतिक बँकेनेही या क्षेत्राला सावरण्यासाठी 50 कोटी डॉलर्सचा निधी मंजूर केला आहे.