२३ गावांचा पुणे मनपा हद्दीतील समावेशाचा निर्णय राजकीय हेतूने
चंद्रकांतदादा पाटील : ह्या गावांच्या विकासासाठी किती निधी देणार ते शासनाने स्पष्ट करावे
पुणे : राज्य सरकारने २३ गावांचा पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत चा घेतलेला निर्णय हा घिसाडघाईने आणि राजकीय हेतू डोळ्यापुढे ठेउन घेतला आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
या गावांचा समावेश हा टप्प्याटप्प्याने करावा व तेथील नागरिकांची आणि प्रशासनाने केलेली मागणी लक्षात घेऊन गावांच्या विकासासाठी पुरेशा निधीची व्यवस्था करुनच गावांच्या समावेशाचा निर्णय घ्यावा ही आमची भूमिका होती मात्र गोंधळलेल्या राज्य सरकारने आज घाईगडबडीत ही अधिसू्चना काढून या गावातील नागरिकांच्या अपेक्षा धुडकावून लावल्या आहेत.
सरकारने या गावांच्या विकासासाठी किती निधी देणार,आणि प्रशासनाच्या मागणीनुसार ९००० कोटी ची तरतूद करुन ती या गावातील विकासकामांसाठी पुणे मनपास देणार का याचा खुलासा करावा असेही आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे मनपा चे उत्पन्न घटले असून मनपा हद्दीत या गावांची भर पडल्याने विकासकामांसाठी खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची तारांबळ होणार असून या गावातील नागरिकांची मात्र फरफट होणार आहे हे सरकारने लक्षात घेतले नसल्याचेही त्यांनी नमूद केले.