मुंबई : खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद थांबता थांबेना. आता या वादाने न्यायालयाची पायरी चढली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला शिवडी येथील मुंबई कोर्टात दाखल केला आहे.
भारतीय दंड संहिता कलम 499 व 500 च्या अंतर्गत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी विनंती शिवडी येथील मेट्रोपॉलिटन मेजिस्ट्रेट 25 नं. न्यायालय येथे केली. न्यायालयाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांच्या विरोधात शौचालयाचा 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा दावा केला होता. या विरोधात मेधा सोमय्या यांनी 18 मे म्हणजे आज सकाळी 11 वाजता शिवडी कोर्ट मुंबई येथे राऊत यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या नावाखाली छळ आणि बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल केली.
यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु झाली असून, पुढची सुनावणी 26 मे रोजी होणार आहे. वकील विवेकानंद गुप्ता, लक्ष्मण कनाल, अनिल गलगली यांनी सोमय्या यांची बाजू मांडली आहे.