सातारा : राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेकांना धक्का बसला आहे. यात सातारा जिल्ह्यातही अशीच काही परस्थिती पाहायला मिळाली आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे.
उदयनराजे यांना त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातच मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने विजय मिळवला आहे.
साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांचे गट नेहमीच चर्चेत असतात. कोणतीही निवडणूक लागली की दोन्ही समर्थक मोठ्या जोशात काम करतात.
साताऱ्यातील कोंडवे हे गाव उदयनराजे यांनी दत्तक घेतलं होतं. या गावात उदयनराजे गटाने जोरदार प्रचार देखील केला होता. तरीही त्यांना यश मिळाले नाही. कोंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला १३ जागांपैकी केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने १० जागांवर मुसंडी मारली आहे.