पिंपरी : भाजपचे गजानन चिंचवडे यांच्या आकस्मिक निधनाचा सखोल तपास करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी कृष्णप्रकाश यांना दिले.
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन देऊन आल्यानंतर पाटील पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘गजानन चिंचवडे यांचा विषय आम्ही प्रामुख्याने लावून धरणार आहे. त्यांचा छळ कुणी केला याबाबत चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण 1993 सालचे असून, दिवाणी न्यायालयातील आहे तरीही पोलीस केस दाखल झाली. त्यामुळे हे सर्व कुणाच्या तरी दबावाखाली सुरू आहे. हा दबाव आम्ही सहन करणार नाही. पोलीस आयुक्तांना याबाबत सखोल तपास करण्यासाठी आज निवेदन दिले आहे. नाहीतर न्यायालय आम्हाला न्याय देईलच.’
पाटील पुढे म्हणाले, ‘ज्या पद्धतीने सत्तेचा दुरूपयोग सुरू आहे, तो आम्ही सहन करणार नाही. काल पुण्यात आमच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्ही पण काही कमी नाही आहोत. ‘हम किसोको टोकते नही और किसी ने टोका तो छोडते भी नही. तुम्ही किती खोट्या केसेस दाखल करून आम्हाला दाबणार आहात. एवढं सगळं करूनही 21 नगरपंचायती पैकी चिन्हावरील 9 नगरपंचायत आम्ही जिंकल्या आहेत.’