पिंपरी : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील म्हाळुगे पोलिस चौकी एम.आय.डी.सी.चाकण येथे तो अधिकारी कार्यरत आहे.
पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी म्हाळुगे पोलिस चौकी एम.आय.डी.सी.चाकण, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक राहुल भदाणे हे चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्याबाबत एक तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात आला होता. याची चौकशी उपनिरीक्षक राहुल भदाणे हे करत होते. त्यावेळी त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज ‘डिमांड’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती ज्योती पाटील या करत आहेत. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.