मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणी तसेच धमकी देणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी शर्मा यांच्यासह एका निलंबित पोलीस अधिकारी आणि इतर एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेंबूर पोलीस ठाण्यात एक वर्षापूर्वी शालिनी शर्मा या कार्यरत होत्या. निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव आणि त्याचा हस्तक राजू सोनटक्के अशी इतर आरोपींची नावे आहेत. अनिल जाधव याने अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी 50 लाखाची खंडणी मागितली होती. तसेच पैसे दिले नाहीतर इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार आरोपीची बहिण शहिदा कुरेशी यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. अशीच तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील करण्यात आली होती.
पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपीकडे व्हॉट्सॲप कॉल करुन दोन लाख रुपये मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. यावर गुन्हे शाखेच्या वतीने तक्रारीची शहानिशा करुन या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर नागपाडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना शाहीन बाग आंदोलन प्रकरणात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्यासोबत खटका उडाला होता. त्यानंतर त्यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. आता त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.