मुंबई : महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून, सचिन वाझे यांचा त्यामध्ये हात असल्याचा आरोप करत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरुन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं. “आमची मागणी आहे राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे. परवा आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत”, असं मुनगंटीवार म्हणाले
भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी 8 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा तिसरा पक्ष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष. “महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी मी आज अमित शाह यांच्याकडे करणार आहे. माझ्या मागणीचे पत्र मी देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे”, असं रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज दुपारी १२:१५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी ते करणार आहेत.