मुंबई : सध्या देशामध्ये अनेक माथेफिरूंकडून समाजाला धर्माचे गाजर दाखवून देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सध्या फक्त स्वैराचार सुरू असून त्यामुळे केवळ भारताचे संविधानच नव्हे तर एकात्मतेलाही तडा जाण्याची शक्यता आहे, अशी भीती आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी व्यक्त केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजित 6 व्या युवा संसदेमध्ये ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य अतिरेक? गळचेपी?’ या विषयावर अमोल मिटकरी बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, विद्यार्थी नेता हर्षवर्धन हरपुडे आदी यावेळी उपस्थित होते.
अमोल मिटकरी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानावर भारताच्या लोकशाहीची वाटचाल चालू आहे. परंतु सध्या मात्र हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण केला जात आहे. धर्म महत्त्वाचा की सर्वसामान्यांना जगवणारा शेतकरी महत्त्वाचा हे आपण ओळखले पाहिजे. हिंदू आणि मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्मापेक्षा शेतकऱ्यांचा धर्म सध्या धोक्यात असून तो धर्म वाचवला तरच आपला देश खऱ्या अर्थाने वाचू शकेल.
अमोल मिटकरी म्हणाले, आजच्या तरुणांनी सरकारला ठामपणे विचारले पाहिजे की, आम्हाला कोणत्याही रंगाशी काहीही घेणे देणे नाही. आम्हाला आमचा रोजगार महत्त्वाचा असून तो रोजगार आम्हाला केव्हा मिळणार? पाकिस्तान हा आमचा शत्रू होताच आणि राहणारच आहे. परंतु भारतामध्ये राहणारा प्रत्येक मुसलमान हा आमचा शत्रू आहे, हे चित्र सध्या रंगवले जात आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. यापासून तरुणांनी सावध राहिले पाहिजे.