पिंपरी : कोरोनामुळं गेली दोन वर्षे आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण आता कोरोना आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. वारकरी ही तशा तयारीत आहेत. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल. अशी घोषणा करण्यात आली आहे.
पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय. यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृध्दी झाली आहे. त्यामुळे लोणंदमध्ये अडीच दिवस तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी मुक्कामी असेल. दिंडीक-यांच्या मागणी नुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी ही माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक झाली. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, ह. भ. प. नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.
आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
मंगळवार दि . २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. बुधवार दि. २२ व गुरुवार दि. २३ रोजी पुणे, शुक्रवार दिं. २४ व शनिवार दि . २५ रोजी सासवड, रविवार दि. २६ रोजी जेजुरी, सोमवार दि. २७ रोजी वाल्हे, मंगळवार दि. २८ व बुधवार दि. २९ रोजी लोणंद , गुरुवार दि. ३० रोजी तरडगांव, शुक्रवार दि . १ व शनिवार दि . २ जुलै रोजी फलटण, रविवार दि. ३ रोजी बरड, सोमवार दि .४ रोजी नातेपुते, मंगळवार दि .५ रोजी माळशिरस , बुधवार दि. ६ रोजी वेळापूर, गुरुवार दि .७ रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दि. ८ रोजी वाखरी तर शनिवार दि. ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दि . १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे ( सदशिवनगर ) , पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत. याबाबत पोलिसांना माहिती द्यावी. वाहनांना पास देताना पुर्वी दिंडीक-यांची अडवणूक होत होती ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली . त्यास सर्व दिंडीप्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळ्यापुर्वी पूर्ण व्हावे.
सासवड येथील पुलाच्या कामासाठी ६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु हे काम अद्याप सुरु नाही. जेजूरीला नवीन तळासाठी ९ एकर जागा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे . तीचा ताबा मिळावा. पालखी सोहळ्यापुर्वी पालखी तळ सुसज्ज व्हावेत. रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दिंड्यांच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागा बदलल्या आहेत. पोलिसांना माहिती नसते. ते गाड्या लावू देत नाहीत. त्यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी.
राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक अखंड असल्याने पालखी सोहळ्याची वाहने उजवीकडून डावीकडे येण्यास अडचण निर्माण होणार आहे . त्यासाठी नियोजन व्हावे . पालखी महामार्गावरील मद्यपानाची दुकाने रस्त्यापासून ५०० ते ७०० मिटर अंतर दूरवर असावीत . पालखी तळासाठी २५ एकर जागा आरक्षित ठेवावी. कुंभमेळ्याच्या धर्तीवर पालखी तळासाठी जागा आरक्षित ठेवावी. माळशिरसला गंगूकाका शिरवळकर यांची समाधी गायब झाली आहे तर वेळापुरचा धावाच नष्ट झाला आहे . वेळापूर येथील मानाच्या भारुडासाठी जागा उपलब्ध करावी, असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले, त्यावर तोडगा काढला जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे २५१ दिंड्या नोंदणीकृत आहेत. तसेच नोंदणी नसलेल्या १२५ ते १५० दिंड्या आहेत. सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील. वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने १५ मे पर्यंत वाहनांचे नंबर, वाहन चालकाचे नांव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत. यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख समाज राहील. त्यादृष्टीने पालखी तळ, आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे पालखी सोहळा प्रमुख ॲड . विकास ढगे पाटील म्हणाले.