पिंपरी : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप मागील एक आठवड्यापासून एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक इंजेक्शन (औषधाची मात्रा) अमेरिकेतून आणण्याची गरज होती. त्यासाठी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली यावेळी डॉक्टरांनी अजित पवार यांच्याकडे एका इंजेक्शनची मागणी केली. त्यानंतर अजित पवार यांनी विशेष प्रयत्न व पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
शनिवारी लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयात पाहून गेल्यानंतर अजित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांनी संबंधित इंजेक्शन मिळवून देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्याची विनंती केली. त्यानंतर भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व डॉ. भारती पवार यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांच्या मदतीने अमेरिकेतून संबंधित इंजेक्शन भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
आमचे बंधू आमदार लक्ष्मण जगताप यांना धीर देण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा यांचे फोन आले. राजकारण बाजूला ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदेशातून इंजेक्शन मिळविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. त्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व भारतीताई पवार यांनी केंद्र शासनाकडून परवानगी मिळवून दिली. अगदी मुख्यमंत्री कार्यालयातून मिलिंद नार्वेकर यांचा फोन आला होता. शिवाय शहराध्यक्ष महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे यांनीही वेळोवेळी मदत करून आम्ही कुटुंबीयांना धीर दिला. अडचणीच्या काळात सर्व नेते पक्षभेद विसरून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात, याचा अनुभव आम्ही जगताप कुटुंबीय घेत आहोत.
– शंकर जगताप, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू