मुंबई : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी कार्यक्रमात गोंधळ उडाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. यानंतर भाजपही आक्रमक झाले. या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध दर्शवत राज्यातील पोलीस यंत्रणेवर लक्ष्य केलं आहे.
सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात स्मृती इराणी यांचा कार्यक्रम ठरलेला होता. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह 5 महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केलीय.
बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली आहे. रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्याआधी महागाईच्या मुद्द्यावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, स्मृती इराणींच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विशाखा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशाखा यांच्यासोबत असलेल्या एका मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. या दरम्यान, इराणींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
“रोज कायदा हातात घेतायत आणि बेकायदेशीर कृत्य करतायत. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असं कृत्य करु लागले तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही हे स्पष्ट या ठिकाणी दिसतंय,”
असं फडणवीस म्हणाले. .
”स्मृती इराणींवर केलेला हल्ला भ्याड आहे. आम्ही देखील त्याला जशाच तसं उत्तर देऊ शकतो. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही पोलिसांना संधी देत आहोत. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशाच तसं उत्तर द्यावं लागेल, हे देखील पोलिसांनी चेतवतो,” असा