मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात सुरु झाली आहे. निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानं धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं शिंदे गटाचा निवडणूक आयोगात दावा केला आहे. या दाव्याची तातडीने दखल घेत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाला मांडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता 14 तारखेआधी धनुष्यबाण गोठवलं जाणार का? याबाबत आता सस्पेन्स वाढला आहे.
निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून मुदतवाढीची माहिती दिली आहे. तसंच त्यांना हवा असलेला शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. या पत्रासोबत पुन्हा एकदा तो तपशील पाठवला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.
शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. आज शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या दाव्याची तातडीनं दखल घेत निवडणूक आयोगानं उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत कागदपत्रं सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आता उद्या ठाकरे गटाकडून किती आणि कसे पुरावे सादर केले जाणार हे पाहावं लागेल. शिवाय अंधेरीतल्या पोटनिवडणुकीआधी चिन्हाचा फैसला येणार की चिन्ह गोठवलं जाणार हे स्पष्ट होईल.