पुणे : पुण्यात 2022 च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आराखडा जाहीर झाला आहे. यानंतर एक प्रकारे निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात बॅनरबाजी सुरू केली आहे. आजवर केलेल्या कार्याची माहिती देणारे फलक, उत्तर कुठेही कोणत्याही मदतीसाठी कॉल करा म्हणून सांगणारे फलक शहरात जागोजागी लागलेले दिसत आहेत. पुण्यातील सानेगुरुजी नगर येथील नगरसेवक धीरज घाटे यांनी देखील असेच बॅनर लावले होते. परंतु या बॅनर विरोधात देखील आता बॅनरबाजी सुरू झाली आहे.
धीरज घाटे हे सानेगुरुजी नगर येथील भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. काही काळ ते विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. दरम्यान आपल्या प्रभागात त्यांनी ‘जिथे गरज तिथे धीरज’ या मथळ्याखाली बॅनर लावले आहेत. कोणत्याही मदतीसाठी एक कॉल करा असे सांगून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे मोबाईल नंबर या बॅनर वर दिले आहे. मागील दोन दिवसांपासून प्रभाग क्रमांक 17 मध्ये हे बॅनर झळकत आहे.
दरम्यान त्यांच्या या बॅनरबाजी विरोधात अज्ञात व्यक्तीने बॅनर लावले आहे. त्यांनी लावलेल्या बॅनरखाली ‘धीरज… आम्हाला नाही तुझी गरज.. आता घरी जा परत’…’, नको बापट नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख… असे बॅनर लावले आहेत.