पिंपरी : मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून आज राकेश मौर्य याला अटक केली आहे. या प्रकरणात आता पर्यत चौघांना अटक करण्यात आली आहे.
राकेश मौर्य हा अटक पूर्व जामीन घेण्यासाठी पिंपरी येथे आला असून एका हॉटेलमध्ये उतरला असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. काल बुधवारी दीपक खरात याला अटक करण्यात आलेली आहे. यापूर्वी चंदन रामकृष्ण ठाकरे यालाही अटक केली आहे. तसेच नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली राजेश साप्ते
(45, रा. चारकोप, कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
राजेश साप्ते यांनी पुणे, ताथवडे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य व अशोक दुबे यांनी कट करुन राजेश साप्ते यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच कामगारांना कामावर येऊ देणार नाही. तसेच व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 1 लाख रुपयांची पैशांची मागणी केली. त्यापोटी त्यांनी 2.5 लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले.
त्यांचा बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले आहे. या पाच जणांच्या जाचास कंटाळून राजेश साप्ते (51) यांनी ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक लोहार अधिक तपास करीत आहेत.