दिवाळी वर्षातून एकदाच येते मात्र राजकारणातील फटाके केंव्हाही फुटतात : सामना

शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज; मुख्यमंत्रीपद धोक्यात ?

0

मुंबई : दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते, असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार?, असा खोचक सवाल शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून विचारला आहे.

शिंदे गटाचे बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे शिंदे गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले.

मुख्यमंत्री शिंदे हे पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज झाले व सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले असले तरी फडणवीस यांना ठोकरून, थोडे रुसून गावी जाऊन बसतील अशी स्थिती नाही. कारण भारतीय जनता पक्षाच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रीपद टिकून आहे व शिंदे यांचे राजकीय अस्तित्व त्या मुख्यमंत्रीपदावरच टिकून आहे. त्यामुळे भाजप शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल.

भाजपच्याच एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, ‘सरकार शिंदे गटाचे चाळीस आमदार चालवीत आहेत व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांचाच ताबा आहे. आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना.’ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेशिवाय जातात.

मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर होईल. पण आपले सर्वपक्षीय शेतकरी राजकारणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले व त्यांनी वानखेडे मैदानावर स्नेहभोजन केले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि शिवसेनेचे लोकही त्यात सामील झाले. हा ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो? आज क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा गुंतला आहे व तो एक किफायतशीर उद्योग बनला आहे. त्यामुळे फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र राजकीय नेत्यांचेच खेळ चालतात.क्रिकेटच्या मैदानावर सर्वपक्षीय राजकीय नेते स्नेहभोजनासाठी येतात. आम्ही खेळात राजकारण आणत नाही, असे जाहीर करतात व त्या मैदानातून खेळाडूंना खडय़ासारखे बाहेर काढतात.

मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदे यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले व मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले. धारावीच्या पुनर्विकासाचे संपूर्ण श्रेय त्यामुळे फडणवीस व भाजपकडे जाईल. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या घोषणेत राज्याचे मुख्यमंत्री कुठेच नाहीत.

पोलिसांच्या बदल्यांत व आपले अधिकारी नेमण्यात शिंदेंना जास्त रस आहे. कारण त्यांच्या चाळीस आमदारांना ते सर्व करून हवे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी हे बदली प्रकरण मानले नाही, तेव्हा मुख्यमंत्री शिंदे नाराज झाले व साताऱयातील गावी गेले, असे वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. ते थेट क्रिकेटच्या मैदानात स्नेहभोजनास अवतरले. मुख्यमंत्री व त्यांचा गट सध्या काय करतो? मूळ शिवसेनेच्या प्रत्येक कामात अडथळे कसे आणता येतील ते सर्व करतो. ठाण्यातील ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमासाठी शिवसेनेस तलावपाळी परिसर मिळू नये यासाठी पुन्हा हायकोर्टात जावे लागले व ठाणे महानगरपालिकेने शिंदे गटाने सर्वप्रथम परवानगी मागितली या सबबीखाली खासदार राजन विचारे यांना परवानगी नाकारली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भाजपने या अशाच कार्यात गुंतवून ठेवले आहे.

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या कुठे भूमिगत झाले आहेत याबाबत कोणी खुलासा करेल काय? मुळात आपले राज्यपाल राजभवनात आहेत की नाहीत, ते गृहमंत्री फडणवीस यांनी जनतेसमोर आणावे. ‘ठाकरे’ सरकारच्या काळात सध्याच्या राज्यपाल महोदयांची काम करून दमछाक होत होती. पूरस्थितीत स्वतंत्र दौरे काढून प्रशासनास वेगळय़ा सूचना देत होते. इतर अनेक प्रशासकीय कामांत त्यांचा थेट हस्तक्षेप होता. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात त्यांचे मन साफ नव्हते व मंत्र्यांना राजभवनावर बोलवून ते सल्ले व सूचना देत होते. मात्र राज्यपालांनी आज शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घेतलेली नाही. अर्थात, राज्यपालांनी अशी दखल घ्यायला राज्यात सध्या काय ठाकऱ्यांचे सरकार सत्तेवर आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.