आमदारांनो कुठेही जाऊ नका; कोणत्याही क्षणी मुंबईत जावे लागेल

0

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे यांना शिवसेनेने गटनेते पदावरून हटवल्यानंतर त्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी कोरोनामुळे दवाखान्यात अ‍ॅडमिट असूनही सर्व हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसते. कारण सर्व सूत्रे अजूनही त्यांच्याच हातात आहेत.

शिवाय, भाजपाने देखील राज्यातील आपल्या सर्व आमदारांना अलर्ट केले आहे. कोणत्याही क्षणी मुंबईत दाखल व्हावे लागेल, असे आदेश भाजपाने आमदारांना दिले आहेत. या सर्व राजकीय हालचाली पाहता महाविकास आघाडी सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी राजीनामा देऊ शकतात, असे वृत्त असतानाच दुसरीकडे भाजपाने आपल्या आमदारांना कुठल्याही दौर्‍यावर न जाता, संपर्कात रहावे, कोणत्याही क्षणी मुंबईत यावे लागेल, असे आदेश दिले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  देखील दिल्लीहून मुंबईत आले आहेत. सागर बंगल्यावर आता बैठकांचे सत्र सुरु झाले असून आमदारांना वरील तातडीचे आदेश पाठविले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 35 नव्हे तर 40 आमदार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय आणखी 10 आमदार येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. हे सर्व संख्याबळ पाहता अनेक राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

गुवाहाटीत पोहचलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांची येथील रॅडिसन हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे.
या बैठकीत गटनेता ठरवला जाऊ शकतो. तत्पूर्वी आपल्या सोबत 40 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता.
गटनेते पदाचा दावा करण्यासाठी शिंदे गोव्याला जाण्याची शक्यता होती. यानंतर शिंदे राज्यपालांना भेटायला जाऊ शकतात. दरम्यान भाजप सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा यानंतर करू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.