पुणे : डेटिंग ॲपवर डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून त्यांच्याशी ऑनलाइन चॅटिंग करत अश्लील व्हिडिओ आणि फोटो मिळवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
संदीप जगन्नाथ धर्मक (28) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये एका डॉक्टर महिलेने फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेची डेटिंग ॲपवर एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याने या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याशी ऑनलाइन चॅटिंग सुरू केली.
या डॉक्टर महिलेचे काही नग्न फोटो आणि व्हिडिओ त्यांनी मिळवले आणि त्या आधारे ब्लॅकमेल करत तिला पैशाची मागणी करू लागला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती उघडकीस आली. आरोपीने टेंडर व हिंज या ॲपवर नॉरमन व रेयान या नावाने फॉरेनर व्यक्तीचे फोटो लावून बनावट अकाऊंट तयार केले. यावरून तो स्वतःला पुणे शहरात मसाज सेंटरचा मॅनेजर असल्याचे सांगून महिलांशी ऑनलाइन चॅटिंग करत होता.
नंतर याच महिलांना विश्वासात घेऊन अश्लील फोटो आणि व्हिडिओ मागून घ्यायचा. ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही महिलांनी बेअब्रू होण्याच्या भीतीने त्याला पैसे दिलेले आहेत.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी लष्कर पोलीस स्टेशन आणि सायबर पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी अशाप्रकारे आणखी कुणाला ब्लॅकमेल केले असल्यास त्यांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.