केजरीवालांना गहू आणि तांदळातील फरक माहीत आहे का?
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
नवी दिल्ली ः दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात ७ डिसेंबरला जाऊन त्यांची भेट घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी टीका केली आहे.
अमरिंदर सिंह म्हणाले की, ”ज्या व्यक्तीने केंद्राचे हे तीन कृषी कायदे दिल्लीत लागू करण्यासाठी अजिबात उशीर केला नाही. तिच व्यक्ती स्वतःला शेतकऱ्यांचा सेवक म्हणवून घेते. त्यांना गहू आणि तांदूळ यातला फरक तरी माहीत आहे का? शेतकऱ्यांसाठी एक काम केलेलं आहे, असं त्यांनी दाखवून द्यावं”, असं आव्हान सिंह यांनी केजरीवाल यांना केले आहे.
मागील १२ दिवसांपासून पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. चिवटपणे सुरु असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांवर प्रारंभी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर बाॅलिवुडमधूनही मोठ्या प्रमाणात सेलेब्रिटीजनी पाठिंबा दर्शविला. देशभरातील किमान ५०० शेतकरी संघटनांनी हे शेतकरी आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, केंद्र सरकारशी ४ वेळा बैठाकाही पार पाडल्या. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत ही बैठक पोहोचली नाही.