प्लाझ्मा दान करा, दोन हजार रुपये मिळवा !

प्लाझ्मा दात्यांना महापालिका देणार दोन हजारांची प्रोत्साहनात्मक मदत

0

पिंपरी : कोरोनाच्या गंभीर रुग्णाला प्लाझ्मा वरदान ठरत आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्णांनाही मोफत प्लाझ्मा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सार्वजनिक रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान प्लाझ्माची मागणी वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत आहे.

अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी “प्लाझ्मा थेरपी’ कडे एक आशेचा किरण म्हणून पाहिलं जात आहे. प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दात्यांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच, या प्लाझ्मा दात्यांना महापालिकेकडून दोन हजार रुपयांची प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे.

सध्या खाजगी रुग्णालयांमधील रुग्णांना प्लाझ्मासाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून या रुग्णांना मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे. याचा शहरातील गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.