पिंपरी : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे ( वय ८६) यांचेसोमवारी रात्री साडेदहा वाजता चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. आळंदी येथे मंगळवारी (ता. २१) दुपारी चारवाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
साखरे महाराज यांची प्रकृती बिघडल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाचसोमवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी यमुना कंकाळ आणिदोन मुलगे यशोधन साखरे व चिदम्बरेश्वर साखरे असा परिवार आहे.
डॉ. किसन महाराज साखरे यांचा जन्म कृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर, १९३८ साली लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांच्या परिवाराला संत साहित्याचा वारसा लाभला होता. त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी संत वाङ्मयाचा अभ्यास करून तो पुढेनेला. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील साधकाश्रमात गुरु–शिष्य परंपरेचा अंगीकार करून त्यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, आणिव्याकरणशास्त्र याचे सखोल अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले.
१९६० मध्ये साधकाश्रमाची जबाबदारी त्यांच्या हाती आली. तेव्हापासून त्यांनी निःस्वार्थपणे साधकाश्रमात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनासंत साहित्य आणि तत्त्वज्ञान शिकवले. महाराष्ट्रभर कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्माचा प्रसार केला. त्यांनी शेकडोकीर्तनकार आणि प्रवचनकार घडवले, ज्यांनी समाजात आध्यात्मिक प्रबोधन घडवण्याचे कार्य पुढे सुरू ठेवले.
वारकरी परंपरेचा आधारस्तंभ
साखरे महाराजांनी आपल्या प्रवचनांमधून गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, आणि उपनिषद यांचे विचार ग्रामीण भागांतील लोकांपर्यंतपोहोचवले. त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीसाठी मोफत बाल संस्कार शिबिरे सुरू केली, ज्यामुळे हजारो विद्यार्थी चांगले नागरिकबनले. त्यांनी वारकरी परंपरेला समृद्ध करण्यासाठी आपल्या आयुष्याची अखेरची क्षणही समर्पित केली.
साहित्य आणि सामाजिक कार्य
डॉ. साखरे महाराजांनी एकूण ११५ ग्रंथांची निर्मिती केली. सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ भगवद्गीता, सार्थ तुकाराम गाथा, आणि सार्थ एकनाथीभागवत यांसारखे त्यांच्या लेखणीतून साकारलेले ग्रंथ वारकरी परंपरेचे अमूल्य योगदान ठरले आहेत. त्यांनी व्यसनमुक्तीचे मोठेसामाजिक कार्य केले आणि अन्नछत्र, ग्रंथालय व भक्तनिवास यासारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले.
पुरस्कार आणि सन्मान
संत साहित्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ज्ञानोबा–तुकाराम पुरस्कार (२०१८) आणि टिळक महाराष्ट्रविद्यापीठाकडून डी.लिट ही सर्वोच्च मानद पदवी मिळाली होती. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला एक नवा आध्यात्मिक दृष्टिकोनमिळाला.
डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन वारकरी संप्रदायासाठी मोठी हानी आहे.