नागपूर : मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका करताना तोल सुटला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका त्यांना सहन करावी लागतेय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय.
सावंत म्हणाले की, सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.
मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल, तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं जबाबदार लोकांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.