डॉ. वि. गो. वैद्य म्हणजे ऋषीतुल्य धन्वंतरी : मिलिंद जोशी

0

पुणे : डॉ. वि. गो. वैद्य म्हणजे रुग्णसेवेचा आदर्श घालून देणारे ऋषितुल्य धन्वंतरी आहेत, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काढले.

लोकमान्य हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. वि. गो. वैद्य यांनी लिहिलेल्या ‘पूर्णाहुती – एक कृतार्थ जीवनप्रवास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते काल झाले. पुण्यातील गोखलेनगर येथील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नामवंत साहित्यिक डॉ. दिलीप कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर,  प्रकाशक स्वानंद क्रिएशनचे संजय भंडारे, डॉ. वैद्य यांच्या पत्नी रत्नप्रभा वैद्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. वैद्य यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमात त्यांचे अभिष्टचिंतनही करण्यात आले.

मिलिंद जोशी म्हणाले की, डॉ. वैद्य हे रुग्णसेवाचा आदर्श निर्माण करणारे ऋषीतुल्य धन्वंतरी आहेत. त्यांनी नेहमीच टिकाऊ काम केले. कधीही दिखाऊ काम केले नाही. रुग्ण आणि डॉक्टर संवादावर त्यांनी सदैव भर दिला. त्यामुळे रुग्णांचे प्रेमही त्यांनी कमावले.

ध्येयनिष्ठा आणि नीतीमूल्य यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी झाळाळी प्राप्त झाली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, डॉ. वैद्य यांनी संशोधनावर भर व सर्वसमावेशकता हे त्यांच्या कार्यपद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कणभर मदत करणाऱ्यांविषयी त्यांनी मणभर कृतज्ञता मानली. त्यांचे आत्मचरित्र म्हणजे  ‘तृप्त पर्व’ आहे.

डॉ. दिलीप कुलकर्णी म्हणाले की, डॉ. वैद्य यांचे हे पुस्तक अभ्यासक्रमातही जावं या योग्यतेचे आहे. डॉ. वैद्य हे नावच लोकमान्य आहे. त्यांच्या ठिकाणी प्रज्ञा, पुरुषार्थ व प्राक्तन यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. त्यांनी स्वीकृत ध्येयावर अविचल निष्ठा ठेऊन त्यांनी आयुष्यभर झोकून देऊन काम केलं.

पुस्तकाविषयी बोलताना डॉ. वैद्य म्हणाले की, या पुस्तकात उपदेश, सल्ले न देता, मते न नोंदविता, घडलं ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यच्या माध्यमातून अशक्यप्राय काम झाले. माझे आयुष्य हीच पूर्णाहुती आहे. जीवन कृतार्थ झाल्याची भावना आहे.

डॉ. वैद्य हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ‘लोकमान्य’ झाले. पिंपरी-चिंचवडची ओळख बनले, पिंपरी चिंचवडचा चारशे वर्षाचा इतिहास लिहायचा झाला तर मोरया गोसावी ईतकेच लोकमान्य रुग्णसेवेचे पवित्र मंदीर आहे हे सुवर्णपान इतिहास म्हणुन लिहावा लागेल या शब्दात भाऊसाहेब भोईर यांनी त्यांचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.