ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीला अटक

0

पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावी हा अखेर पुणे पोलिसांच्या  ताब्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

किरण गोसावी याने आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्यात तो फरार असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढली होती. त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला जाऊन धडकले होते. परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून फरार झाला होता. याप्रकरणी चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे.  शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (२७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. चिन्मय देशमुख याचे पैसे तिच्या खात्यात जमा झाले होते. किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.