मुंबई : क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपानंतर ‘एनसीबी’ संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.
वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाल्याची माहिती एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंह यांनी आज दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी उपमहासंचालकांनी दिलेला अहवाल एनसीबीच्या संचालकांना मिळाला आहे. त्यांनी या प्रकरणी दक्षता विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करतील. चौकशी आताच सुरू झाली असून, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल लगेच टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही.
आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. एनसीबीवरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टि्वट करीत वानखेडेंबाबत गैाप्यस्फोट केला आहे. यातच प्रभाकर साईल हा आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्याने या प्रकरणात मुंबई पोलीसही उडी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र आज सादर केले. न्यायाधीश वैभव पाटील यांच्या विशेष एनडीपीएस कोर्टात हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवर होऊ नये, यासाठी एनसीबीने हे पाऊल उचलल्याचे समजते.
या प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या आरोपाची न्यायालयाला माहिती दिली आहे. स्वतंत्र साक्षीदाराने साक्ष फिरवल्याप्रकरणाची कोर्टाला माहिती देण्यात आली. एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. वानखेडेंनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. समीर वानखेडे स्वत: न्यायालयाला काही माहिती देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहिले.
एनसीबीकडून याबाबत आता प्रसिध्दीपत्रक देण्यात आले आहे. यासंबंधीच्या आरोपाच्या तपासासाठी संबधीत प्रकरण महासंचालक, एनसीबी यांना पाठविण्याचा निर्णय विभागीय महासंचालक मुथा अशोक जैन यांनी घेतला आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांनी यावर मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहित त्यांच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या या प्रतिक्रियांचं भांडवल करत सुरक्षेची मागणी केली आहे. ‘मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. काही अज्ञात लोक माझ्यावर कारवाई करू शकतात. असा दावा समीर वानखेडे यांनी पत्रात केला आहे.