नवी दिल्ली ः संपूर्ण जग करोनाच्या संकटातून बाहेर पडण्याची धडपड करत आहे आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठीदेखील तयार झाली आहे. अशात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले आहे की, “सरकारने आतापर्यंत ८३ कोटी सीरिंज खरेदी केल्या आहेत. नव्या वर्षाच्या प्रारंभीच करोनाच्या लसीकरणाचा ड्राय रन म्हणजे रंगीत तालीम पार पडणार आहे. ही तालिम २ जानेवारीला घेतली जाणार असून सर्व राज्यांमध्ये हा ड्राय रन पार पडणार आहे”, अशी माहिती डाॅ. व्ही. जी. सोमानी यांनी दिली आहे.
यापूर्वीच पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये ड्राय रन पार पडला होता आणि त्याचे रिजल्टही चांगले समोर आलेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने २ जानेवारीला सर्व राज्यांमध्ये करोनाच्या लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्राची संपूर्ण तयारी झालेली आहे. नव्या वर्षांमध्ये हा ड्राय रन होणार आहे.
भारतासह अनेक मोठ्या देशांना करोनाचा फटका बसत आहे. करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्याही खूप आहे. त्यात ही बाब भारतीयांनी खूप महत्वाची आहे, असे मानले जात आहे. २०२० वर्ष हे करोनाच्या भितीखाली गेलेलं आहे. मात्र, करोना लसीचे चाललेले प्रयत्न हे आशादायी आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा ड्राय रन खूप महत्वाचा ठरणार आहे.