पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर 2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका केसमधे पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे. डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर त्यांच्याकडे फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल महाराष्ट्र फ्लॅट ओनर एक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नी मागील काही फेब्रुवारी 2018 पासून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल तुरुंगात कैद आहेत.
वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यासह त्यांचे कनिष्ठ अॅड. रितेश येवलेकर यांनी 13/08/2016 रोजी सिंहगड पोलीस स्टेशन, पुणे येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये श्री. डी.एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी श्रीमती हेमंती दीपक कुलकर्णी यांची बाजू मांडली. श्री कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि फ्लॅटचा ताबा त्या खरेदीदारांना देण्यात ते जाणूनबुजून अयशस्वी ठरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या संदर्भात कुलकर्णींना 05/03/2019 रोजी अटक करण्यात आली होती आणि ते 17/02/2018 पासून मुख्य FIR संदर्भात न्यायालयीन कोठडीत होते.
लोकांना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांनी अॅड आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड रितेश येवलेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला होता. जो जाहीर करताना हायकोर्टानं डीएसकेंना कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली होती.