पिंपरी : पिस्तूलाचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर जमा झालेली 12 लाखांची रोकड चोरण्याचा ‘प्लॅन’ खाकीतील ‘दुर्गे’मुळे फसला. रोकड भरायला आलेल्या पंपावरील कर्मचाऱ्याच्या पातळीवर असलेल्या ताब्यात घेण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की; आकुर्डी येथे एचपी पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी दोन दिवसात 12 लाख रुपये रोकड जमा झाली होती. ही रोकड आज सोमवारी बँकेत जमा करण्यासाठी पंपावरील अमोल राजाभाऊ चौधरी हा निघाला होता.
आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी तो आला असता चौधरी हा बँकेच्या पायऱ्या चढत असताना एका अज्ञात इसमाने त्याच्या हातातील पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी जवळच असलेल्या महिला पोलीस शिपाई काळे आणि नागरिकांनी तत्काळ त्याला पकडले.
निगडी वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांना घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस पाठवले. प्रमोद नामदेव चांदणे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असतात्याच्याकडे पिस्टल व चार राऊंड आढळून आले. तसेच तपास करून चांदणे याच्या आणखी दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. नवरात्रोत्सव आज पासून सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी खाकीतील ‘दुर्गा’ काळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टळली आहे. त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.