कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. आज पहाटेच ईडीच्या 4 ते 5 अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व हसन मुश्रीफ यांचे समर्थक हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. या कारवाईविरोधात व केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारीच मोठा दिलासा दिला होता. हसन मुश्रीफ यांच्यावर तूर्तास कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत. उच्च न्यायालयाने 24 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ईडी सध्या तरी हसन मुश्रीफ यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई किंवा हसन मुश्रीफ यांना अटक करणार नाही, अशी शक्यता आहे.