मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी विभागात होत असलेल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, बदल्यांमधील आर्थिक व्यवहार, अनियमितता याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून मनी लाँर्डींग प्रकरणात चौकशी केली जात आहे. आता याच प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांचीही चौकशी सुरू केली आहे. परब यांना ईडीनं रविवारी नोटीस पाठवली असून सोमवारी खरमाटे यांच्या घरासह तीन ठिकाणी छापे टाकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून परब यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे यांचंही नाव घेण्यात आलं आहे.
खरमाटे यांचे नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. आरटीओ विभागातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भात ईडीने छापेमारी केली आहे. खरमाटे हे परब यांच्या जवळचे मानले जात असल्यानं त्यांचा परिवहन विभागात सतत राबता असायचा. यापूर्वीही त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या आहेत. खरमाटे पेण आणि सोलापूर येथे असताना दोन वेळा निलंबित झाले होते. बदली व पदोन्नतीसाठी त्यांच्या मुंबई व पुण्यात सतत फेऱ्या होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याअनुषंगाने खरमाटे हे ईडीच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान, गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये परब यांच्यासह खरमाटे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, उप परिवहन आयुक्त जितेंद्र कदम, उपसचिव प्रकाश साबळे, परिवहन विभागाचे अवर सचिव डी. एच. कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांची नावे घेण्यात आली होती. पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडून चौकशी समितीही नेमण्यात आली होती. नाशिकच्या हद्दीत असा कोणताही गुन्हा घडला नसल्याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता.