अनिल देशमुखांना मंगळवारी हजर राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

0

मुंबई : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितला. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

त्यानंतर ईडीने आता पुन्हा देशमुखांना समन्स पाठवले आहे. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ईडीच्या चौकशीसंदर्भात देशमुख यांचे वकील जयवंत पाटील म्हणाले की, “आम्ही ईडीला अर्ज करून चौकशीची अंमलबजावणी कोणत्या आधारे केली जात आहे, याची कागदपत्रे मागितली आहेत.” आमच्याकडे तपासणीच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. म्हणून आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीला यावर निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना समन्स बजावून शनिवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्याला बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) समन्स बजावण्यात आले होते आणि देशमुख यांना हजर होण्यास सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुसरी वेळ मागितल्यानुसार ईडीने पुन्हा समन्स बजावून मंगळवारी चौकशीला बोलाविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.