मुंबई : नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील ३६ वर्षांपासून नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिला आहे. गाजियाबाद भाजपाचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात एफआयआर दाखल केली.
२००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपाच्या नेत्याने केला होता. ईडीने राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणा-या एनजीओवर कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या सर्व प्रकरणासंदर्भात मेधा पाटकर यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडताना, ‘‘आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून हे आमच्या सारख्या जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान आहे,’’ असे म्हटले आहे
‘नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या खो-यात काम करत आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर काम करणा-या या अभियानाबद्दल एक खळबळजनक बातमी मागील तीन चार दिवसांपासून पसरवण्यात गेली आहे, असे म्हणत आपली बाजू मांडणा-या मेधा पाटकर यांच्या स्पष्टीकरणाचा व्हीडीओ समोर आला आहे.
आमच्यावर जो आरोप लावण्यात आला आहे तो धादांत खोटा असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. त्यांनी असे दाखवले आहे की २० लोकांकडून एकच राशी आम्हाला एकाच दिवशी मिळाली. पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाही. आम्हाला हे मान्य नाही. ही राशी कुठे मिळाल्याचेही आम्हाला आढळलेले नाही, असे मेधा पाटकर यांनी पुढे बोलातना स्पष्ट केले आहे.
‘‘याबरोबरच माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगाने नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जी राशी दिली होती त्याही बद्दल शंका कुशंका उपस्थित केल्या आहेत. प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला जो सहय्योग दिला तो भूतपूर्व जिल्हाधिकारी नंदूरबार यांनी केलेल्या शिफारशीवरुन दिला. माझगाव डॉकने नंदूरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना अनेक प्रकारची मदत दिली आहे, असेही मेधा पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना, त्यांनी आमच्या जीवन शाळेतील छात्रालयामधील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोन वर्षांसाठी मदत दिली. आधी काही काळासाठी नंतर येऊन, बघून, समाधान व्यक्त करुन ती मदत अधिक काळासाठी दिली गेली. त्यामुळे आम्हाला नक्कीच सहयोग मिळाला. पण त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाऊंट्स, त्याचे ऑडिट, त्याचे रिपोर्ट सर्वकाही माझगाव डॉकला प्रस्तुत केले गेले. त्यांनी मुल्यांकनही केले आहे. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये याचा उल्लेख आहे, असे मेधा पाटकर यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना मेधा पाटकर यांनी हे कारस्थान आंदोलन बदनाम करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. हे जे काही कारस्थान चाललंय ते आमच्या जन आंदोलनाला आणि संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्यासाठी म्हणून केलेले आहे. व्यक्तीश: माझ्याविरोधात आणि आंदोलनाविरोधात अशाप्रकारची एक केस दाखल झाली होती, असे म्हणत या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही केस रद्द करत याचिका कर्त्याला दंड केला होता, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.