शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक  यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये त्यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एनएसईएल या घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

या घोटाळ्यामध्ये ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या दोन जमिनींची किंमत 11.35 कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने यापूर्वीही एनएसईएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही हालचाल पाहायला मिळाली नव्हती मात्र आज अचानक ईडीने धाड मारत कारवाई केली आहे.

प्रताप सरनाईक यांना याआधी ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं आणि काही कागदपत्रांची चौकशी केली होती.
त्यांनंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करण्यात आली होती. सरनाईक यांना अनेक समन्स बजावले होते मात्र ते हजर राहत नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयानंतर सरनाईक हे एकदा चौकशीसाठी गेले होते मात्र त्यानंतर आज ईडीने कारवाई केल्याने ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिवसेनेसाठी हा दुसरा धक्का आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने धाड टाकत मोठी कारवाई केली होती. त्यांचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले होते त्यांची किंमत ही 6.45 कोटी इतकी होती. आता शिवसेना काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.