पुणे : पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या म्हाडा, शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) व आरोग्य विभाग परिक्षा घोटाळा प्रकरणाचा आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास केला जाणार आहे. त्यादृष्टीने “ईडी’कडून म्हाडा, आरोग्य विभाग व “टिईटी’ प्रकरणासंबंधीची कागदपत्रे पुणे पोलिसांकडून मागविण्यात आली आहेत.
आरोग्य विभागाच्या परिक्षेमध्ये गैरप्रकार केला जात असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला, त्यापाठोपाठ पोलिसांनी म्हाडा व टिईटीमध्येही गैरप्रकार झाल्याचे उघड करीत त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार पुढे आणण्यात आला होता.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा कसून शोध घेत तिन्ही क्षेत्रातील मोठ्या अधिकाऱ्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये जप्त केले होते. दरम्यान, मागील वर्षभर या प्रकरणाची राज्याच्या वेगवेगळ्या भागात कारवाई सुरु होती.
दरम्यान, मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा तपास “ईडी’ करणार हे निश्चित झाले. त्यानंतर “ईडी’च्या पथकाने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे मागवून घेतली. ईडीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.