भोसरीतील विवादीत भुखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर पुराव्यांची जुळवा जुळव करण्यासाठी आणि खटल्यासंबंधी कागदपत्रे मिळविण्यासाठी संबंधित विभागाने पाठविलेले एक प्रतिनिधी अॅड. असिम सरोदे यांच्या कार्यालयात आले होते. मात्र, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून प्रतिनिधी नाराजी व्यक्त करत कागदपत्रे न घेताच बाहेर निघुन गेला.
अंजली दमानीया यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांना ईडीने खडसेंच्या विरोधातील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाची कागदपत्रांची माहिती मागितली होती. त्यानुसार अॅड. सरोदे यांनी ईडीच्या मागणीला सहमती दर्शवत कागदपत्रे देण्याचे मान्य केले होते. ईडीच्या अधिका-यांनी मागणी केल्यानुसार अॅड. सरोदे यांनी १ हजार ३४० पाने झेरॉक्स करून ठेवले होते. त्यानुसार आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ईडीचा एक प्रतिनिधी अॅड. सरोदे यांच्या कार्यालयात आले होते. परंतु, संबंधिताने ईडीमध्ये काम करत नसल्याचे सांगत फक्त कागदपत्रे घेण्यासाठी आलो असल्याची माहिती त्यांना दिली. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहिल्यानंतर संबंधित प्रतिनिधी मोबाईलवर बोलत कागदपत्रे न घेताच बाहेर पडला.