मुंबई : कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याच्या जीआर वरून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तोंडघशी पडल्या आहेत. अवघ्या काही तासांच्या आत त्यांनी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा जीआर मागे घेतला. त्याच्या या निर्णयामुळे शालेय शिक्षण मंत्री आणि मंत्रालयातील शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जीआर तयार केला होता. तो काढताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याच्या मसुद्यावर सही केल्यानंतरच तो जीआर जाहीर करण्यात आला, मात्र त्यामध्ये उणिवा असल्याचा साक्षात्कार गायकवाड यांना काही तासानंतर झाल्याने हा जीआर मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर खापर फोडण्यात आले असल्याचे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सूत्राने सांगितले.
जीआर मागे घेण्यात आल्यानंतर तो सरकारच्या संकेस्थळावरून हटवण्यात आला आहे. तर या जीआर वरून राज्यभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या असल्याने यावर सारवासारव करत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी लवकरच नवीन सुधारित जीआर काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्यात आणखी काही मार्गदर्शक सूचना आणि इतर माहिती दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, या जीआर वरून मंत्रलायातील अधिकारी आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
या जीआरचा मसुदा काही दिवस अगोदर सहीसाठी मंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता, मात्र तो काही सल्लागार प्रतिनिधींनी रोखून धरण्याचा सल्ला मंत्र्यांना दिला होता, त्यामुळे यात गोंधळ निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय आणखी असेच शिक्षणहिताचे दोन जीआर आणि त्याच्या मसुद्याचा विषय काही दिवस रखडला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.