खेळाडूंना मैदाने, सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्नशील : शंकर जगताप

0

पिंपरी : नवीन पिढीला खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध झाली तर निश्चितच पिंपरी-चिंचवडमध्ये क्राडी संस्कृती निर्माण होईल. आपल्या शहरातून आणखी चांगले, दर्जेदार खेळाडू घडतील व पिंपरी-चिंचवड शहराला देशाचा “क्रीडा हब” म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी व्यक्त केला. शहरात सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारांना मैदाने आणि दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकडमध्ये विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वाकड प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाचा चषक अनावरण सोहळा रविवारी (दि. 9) दिमाखात पार पडला. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या सभासदांसाठी आयोजित करण्यात येणारी वाकड प्रीमियर लीग ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. यामध्ये 240 हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे भव्य अशी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेचे वाकडकरांना विशेष आकर्षण असते. वाकडमधील सर्वच सोसायट्यांचे सभासद या स्पर्धेत सहभागी होऊन उत्साहात सामने खेळतात.

या स्पर्धेचे चषक अनावरण भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी महापौर उषा ऊर्फ मा ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले, “वाकड येथील पेठ क्रमांक 39, कावेरीनगर भाजी मंडई शेजारील खेळाचे मैदान आधी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे होते. आता ते पीएमआरडीच्या ताब्यात आहे. हे मैदान पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतर होऊन ते वाकडकरांना उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. लवकरच हे मैदान वाकडकरांना उपलब्ध करून देऊ.

शहरात आवश्यक त्या प्रमाणात क्रीडांगणे व मैदाने तयार झाली तर खरोखरच शहरातील क्रीडा क्षेत्राला एक वेगळी दिशा मिळेल. शहरात क्रीडा संस्कृती निर्माण होईल. त्यातून दर्जेदार आणि चांगले खेळाडू घडतील. आपल्या शहराला “क्रीडा हब” म्हणून ओळख मिळेल. त्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. सर्व क्रीडा प्रकारांना मैदाने आणि खेळाडूंना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

Leave A Reply

Your email address will not be published.