पोलीस विभाग आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे : पोलीस आयुक्तालय, पोलीस स्टेशन व पोलिसांसाठी चांगली घरे तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देऊन पोलीस विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील, असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे केले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात अनुकंपा भरती पोलीस पाल्याना प्रातिनिधिक स्वरुपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच नागरिकांना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर आदी उपस्थित होते. यावेळी निखिल पवार, अभिजित दळवी, राहूल सरवदे, अक्षय निकम, आकाश घुले, कोमल खैरनार, लोचना महाडिक, श्रीमती आदिती जाधव- टोपले, साकेत सोनवणे व राजू भालेराव यांना प्रातिनिधिक स्वरुपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलीस विभागाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासह या विभागातील रिक्त पदभरतीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस विभागाला अधिक मजबूत करण्याचं काम शासन करत आहे, तथापि, पोलिसांनी देखील सेवा बजावताना नियमांचे पालन करुन चोखपणे कर्तव्य पार पाडावे. गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीचं उदात्तीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, चोऱ्या होवू नयेत, यासाठी रात्रीची गस्त वाढवा.

गुन्हेगारांवर वचक राहील असं काम करा. सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रशिक्षण द्या. कर्तव्य निभावताना एकही चुक घडू नये, याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर आपल्या दागदागिन्यांची चोरी होवू नये यासाठी नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी, वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांद्वारे उघड करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना प्रतिबंधासाठी पुण्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करुन उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येईल. तथापि नागरिकांनी देखील मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे अशाप्रकारे स्वयंशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.