पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात
अटक आठ आरोपींची शुक्रवारी २२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पहाटे सहा जिल्हयात छापेमारी करीत त्यांना अटक केली आहे.
भागवत गणपत भंगाळे, छगन शामराव झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, असिफ मुन्ना तेली, जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला, राजेश शांतिलाल लोढा आणि प्रीतेश चंपालाल जैन (सर्व रा.जळगाव) अशी या प्रकरणी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर गुरुवारी (ता. १७) तीन आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात रंजना घोरपडे (वय ६५, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिलेली आहे. बीएचआरचे संचालक व प्रशासक यांनी संगनमताने ठेवीदारांची ६१ कोटी ९० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेऊन स्वत:चे पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. ठेवीदारांचे ठेवपावत्या जमा करण्यासाठी एजंटची नेमणूक केली होती. त्या एजंटची चौकशी पोलिसांनी आहे. बीएचआरचे संचालक व प्रशासक यांच्याशी संगनमत करून आरोपींनी गुन्हा केला आहे. संचालक सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयात मिळालेल्या संगणकावरील डेटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळाल्या आहेत. अटक आरोपींचा त्यांच्याशी काय संबंध आहे, याचा तपास करावयाचा आहे.
ठेवीदारांना त्यांच्या ठेव पावतीच्या २० ते ४० टक्के रक्कम देऊन स्टॅम्पपेपरवर त्यांना पूर्ण रक्कम मिळाल्याचे लिहून घेत सह्या घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व मुद्य्ांचा तपास करायचा असल्याने आरोपींना १० पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केली. विशेष सत्र न्यायाधीश एस. नांदेडकर यांनी आरोपींना २२ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुचेता खोकले करीत आहेत.