पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून लाच घेताना पकडले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या केबीनची झडती घेतली असता तब्बल साडेआठ लाखांहून अधिक ‘बेहिशोबी’ रक्कम आढळली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केल्यानंतर स्थायीचे अध्यक्ष अॅड. लांडगे आणि स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या घराची झडती घेतली आहे. ही कारवाई पहाटेपर्यंत सुरु होती. स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, मुख्य लिपिक व स्थायी समितीचे अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे, शिपाई अरविंद भिमराव कांबळे अशा पाच जणांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार आल्यानंतर अतिशय गुप्तता पाळण्यात आली. थोडी जरी शंका आली असती तर सापळा कारवाई अयशस्वी होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई कशी करायची याचे नियोजन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे, हवालदार सरिता वेताळ, अश्यापक इनामदार, अंकुश माने, पोलीस अंमलदार अविनाश इंगुळकर, चंद्रकांत कदम यांनी प्रत्यक्ष सापळा कारवाई यशस्वी केली.