पुणे : एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 7 लाख 81 हजार 350 रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ही कारवाई येरवडा परिसरात करण्यात आली आहे.
समीर उर्फ आयबा शहाजहान शेख असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस ठाण्याचे एक पथक शुक्रवारी गस्तीवर असताना समीर शेख संशयितरित्या फिरताना पोलीस निरिक्षक विनायक गायकवाड यांना आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन सखोल चौकशी करुन त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे 52 ग्रॅम 090 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ सापडला. त्याची बाजारातील किंमत 7 लाख 81 हजार 350 रुपये आहे.
या तपासणीच्या वेळी पोलिसांनी शेख याच्याकडून पाच हजार रुपये रोख, एक हजार रुपयांचा ईलेक्ट्रानिक वजन काटा, एक हजार रुपयांचा मोबाईल आणि छोट्या प्लॅस्टीकच्या पिशव्या असा 7 लाख 88 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. येरवडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.