पुणे : अमेझॉनच्या ॲप मध्ये मराठी भाषेचा पर्याय नसल्याच्या वादातून कोंढाव्यात काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉन च्या कार्यालयाची तोडफोड केली होती. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रोहित शाहू सोनवणे, मयुर प्रकाश जगताप, अमित अशोक जगताप, सौरभ दीपक टिळेकर, अक्षय सुरेश जगताप, आकाश साधू आवटे, मयूर शांताराम चव्हाण आणि निखिल शांताराम जगताप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एड. विजय ओंकारनाथ तेलंग (वय 43) यांनी कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे.
ॲमेझॉन च्या वेबसाईटवर मराठी भाषेला स्थान दिले जावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. मनसेच्या या मागणीकडे ॲमेझॉन कडून सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मनसेने मुंबईत ॲमेझॉन विरोधात फलक लावले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दिंडोशी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी कोंढव्यातिल ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.