पुणे : लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ जणांचा जामीन अर्ज न्यायालायने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीस एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला. जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन मेजर आणि ॲकॅडमी चालकांचा समावेश आहे.
मेजर किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिती (ता. ३९, सॅपिअर विहान कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३१, रा. दिघी कॅम्प, मुळ रा. जळगाव), उदय दत्तू औटी (वय २३, रा,. खडकी, मुळ रा. अहमदनगर), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. नगरदेवळा, जळगाव), मेजर थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंग्टन, तमिळनाडू), वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश), विरा प्रसाद कोटीस्वामी नारगेपाटी (वय ४१, रा. आंध्रप्रदेश) अशी जामीन फेटाळण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लष्कर भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा पेपर परिक्षेच्या एक दिवस आधी मिळण्यासाठी ॲकॅडमी चालक आरोपींनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पाच लाख रुपये घेतले असल्याची धक्कादायत बाब तपासातून पुढे आली आहे. या गुन्ह्यात अटक चार आरोपींच्या राज्यात विविध ठिकाणी ॲकॅडमी आहेत.
लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील ४० हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परिक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती.
आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. सर्व आरोपींनी संगनमत करून, कट रचून लेफ्टनंट कर्नल भगत प्रितसिंग बेदी याच्याद्वारे परिक्षेचा पेपर फोडून ते एकमेकांना व्हॉटसअपद्वारे व उमेदरावांना पाठविला आहे. फोडलेला पेपर आणि परिक्षेचा पेपर एकमेकांशी जुळविल्याबाबत लष्कराचा अभिप्राय अजून मिळालेला नाही. सर्व आरोपींचे मोबार्इल मधील व्हाटॲपचा डेटा प्राप्त मिळविण्यासाठी व्हॉटसॲपच्या अमेरिकेतील मुख्यालयात पत्रव्यवहाक केला आहे. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.