एकनाथ खडसे यांची एकनाथ पवार यांच्या घरी भेट; तासभर चर्चा

भाजपच्या दोन नगसेवकांची भेट; 22 नगसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात

0

पिंपरी : महापालिका प्रभाग रचनेच्या आराखड्याने शहरातील भाजप नेते  प्रभागांचे लचके तोडल्याचा याआरोप करत आहेत. असे असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी भाजपाचे माजी पक्षनेते आणि जेष्ठ नगरसेवक एकनाथ पवार यांच्या घरी अवर्जून भेट दिली आणि चर्चा केली. तत्पूर्वी ऑर्चिड हॉटेलमध्ये भाजपाचे विद्यमान पक्षनेते नामदेव ढाके यांनीही खडसे यांची स्वंतत्र भेट घेतल्याने शहर भाजपामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपाचे तगडे २२ नगरसेवक हे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

महापालिका निवडणुका आता मार्च नव्हे तर एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. १३ मार्च रोजी महापालिकेची मुदत संपत असून त्यानंतर दोन महिन्यांसाठी प्रशासक नियुक्त करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. मार्च मध्ये भाजपाला मोठे खिंडार पाडून सळो की पळो करून सोडायचे अशी व्युहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात आल्याने ज्या नगरसेवकांच्या विविध भानगडींच्या फाईल तयार आहेत त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 

लाचखोरीच्या प्रकरणात स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि आता खंडणीच्या प्रकऱणात केशव घोळवे यांचे नाव सापडल्याने राष्ट्रवादीला भाजपा विरोधात प्रचाराला मोठे मुद्दे मिळाला आहे. आता मराठवाडा, विदर्भ, खांदेश, कोकणातील राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते शहरात आणून त्या त्या भागातील इच्छुक तसेच समर्थकांना आपल्याकडे आणायची मोहिम राष्ट्रवादीने उघडली आहे, असे सांगण्यात आले.

 

जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सकाळी एकनाथ पवार यांच्या घरी चहापान केला. पवार यांनी खडसे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती, पिंपळे गुरव, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार आणि मित्र परिवारानेही खडसे यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माजी आमदार विलास लांडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराराध्यक्ष संजोगजी वाघरे पाटील, राष्ट्रवादी कार्यकर्त्या सारिकाताई पवार, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य विजय लोखंडे, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. मराठवाडा भुषण छावा धनाजी येळकर पाटील, आदी उपस्थित होते.

 

या भेटीबद्दल एकनाथ पवार यांच्याशी संपर्क केला असता पीसीबी टुडे शी बोलताना ते म्हणाले, खडसे साहेब आमच्या कौटुंबिक संबंधातून भेटीसाठी आले होते. खांदेशी बांधव आपल्या प्रभागात मोठ्या संख्येने आहेत, त्यापैकी सारिका पवार या खडसे यांच्या कुटुंबातील असल्याने त्यांच्याकडे जाताना चहापानासाठी आमच्या घरी आले होते. त्यातून राजकिय अर्थ काढू नये.

 

नामदेव ढाके यांची खडसे यांच्या बरोबर चर्चा –
खांदेशी बांधवांचे शहरातील एक जेष्ठ नेते म्हणून महापालिकेतील सत्ताधारीनेते नामदेव ढाके यांचा मोठा परिचय आहे. भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा जो राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश झाला होता त्याचे खरे शिल्पकार ढाके होते आणि त्यावेळी एकनाथ खडसे यांनीच आमदार जगताप यांचे भाजपामध्ये स्वागत केले होते. नामदेव ढाके हे खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. आज सकाळी ऑर्चिड हॉटेलमध्ये खडसे यांच्या बरोबर ढाके यांची विशेष भेट झाली. बराच वेळ चर्चा झाली, पण चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. दरम्यान, या भेटीबद्दल ढाके यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

माजी आमदार विलास लांडे यांनी ढाके यांची खडसे यांच्या बरोबर भेट झाल्याचा माहितीला दुजोरा दिला. शहरातील रथीमहारथी असे भाजपाचे २२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे लांडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.