एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी

0

मुंबई : नाराज शिवसेना आमदार घेऊन गुजरातमध्ये दाखल झालेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पहिला झटका बसला आहे. शिवसेनेकडून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असताना एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटवलं आहे. आता अजय चौधरी हे नवे गटनेते असणार आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या कारवाईनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे टायमिंगची चर्चा पुन्हा रंगली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये शिंदे म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नसल्याने एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 22 आमदार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.