मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर फ्लोअर टेस्टसाठी आपण उद्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत येणार असल्याचे स्वत: शिंदे यांनी सांगितले. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्रावरील राजकीय संकट लवकर टळू दे असं मागणं देवीकडे मागितलं असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे देवीच्या दर्शनासाठी परवानगी मागितली होती.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, कामाख्या देवीचे दर्शन हा श्रद्धेचा विषय आहे. देवीकडे सर्वच जण आपलं मागणं घेऊन येतात. देवी त्यांना आशीर्वाद देते. त्यामुळे आपण इकडे आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत अशी मागणी देवीकडे केली आहे. उद्या आम्ही सर्व आमदार मुंबईत येणार आहे. फ्लोअर टेस्टसाठी जी काही प्रक्रिया करायची आहे ती आम्ही पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रसार माध्यमातून दाखवण्यात येत असलेल्या वृत्ताचा आधार घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, प्रसारमाध्यमातून शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला असल्याचे दाखवण्यात येत आहे.